राज्यात चार दिवस वादळी वार्‍यासह पाऊस   

पुणे : राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे काही भागाला यलो, तर काही भागाला ऑरेज अलॅर्ट देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे तपमानात घट झाली आहे. 
 
वार्‍याची चक्रीय स्थिती मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर आहे. कमी दाबाचा पट्टा दक्षिण छत्तीसगड ते मध्य महाराष्ट्र व लगतच्या चक्रीय स्थितीपर्यंत आहे. उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर असलेल्या चक्रीय स्थिती ते कोमोरिन क्षेत्रापर्यंत जात आहे. कोकण, गोव्यात पाच दिवस, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात दोन दिवस, कोकणात चार दिवस पावसाचा अंदाज आहे. समुद्राच्या वरच्या भागावर मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले आहे. वार्‍याची दिशा बदलून भूभागाच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळेच वातावरणात हा बदल झाला आहे. पुढील चार दिवस हे वातावरण कायम असणार आहे. 
 
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागात यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात पावसाचा अंदाज आहे. जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात ऑरेज अलॅर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काही भागासाठी ऑरेज अलॅर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छ. संभागीनगर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 
 
बारा जिल्ह्यात गारपीटीचा अंदाज 
 
राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. मेघगर्जना, वादळी वार्‍यासह जळगाव, पुणे, सातारा, सांगली, नगर, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित भागात मात्र जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागार्न वर्तविला आहे. 

Related Articles